- अभिषेक भोसले यवतमाळ महाराष्ट्राच्या मध्य पूर्व भागात वसलेलं आहे. सोबत दिलेल्या फोटोतील नकाशामध्ये जो निळ्या रंगाचा भूप्रदेश आहे तो यवतमाळचाच आहे. त्या भागाला विदर्भ असंही म्हणतात. म्हणजे यवतमाळपासून पलीकडं विदर्भच. यवतमाळमध्ये अप्सरा, सरोज, राजकुमार, बरखा, दिप्ती, संजय, वर्षा, मंगला, शंकर तसंच ई-स्क्वेअर एलिमेन्ट्स या नावाची सिनेमागृहं आहेत. 2015 मध्ये राजवाडे अँड सन्स, 2016 मध्ये वजनदार आणि 2017 मध्ये गुलामजाम नावाचे सिनेमा या सिनेमागृहांमध्येही लागले होते. यवतमाळ, दिग्रस, राळेगाव, बाभूळगाव, उमरखेड, कळंब, अरणी, महागाव, वणी, धारवा, केळापूर, मारगांव, नेर, झरी जमनी, पुसद इत्यादी तहसील या जिल्ह्यात आहेत. या सगळ्या ठिकाणी मिळून एकत्रित 2077144 एवढी आपल्यासारखीच माणसं राहतात. म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण माणसांच्या 2.63 टक्के. ही 2.63 टक्के माणसं मराठी बोलतात, ऐकतात, लिहितात. त्यामुळं वर नावं लिहिलेल्या सिनेमागृहांमध्ये जाऊन कधी कधी मराठी चित्रपटही पाहतात. काही माणसं गोंड राजा, गोंड प्रधान, कळम, आंध आणि बंजारा या आदिवासी समुदायातील असल्या कारणानं त्यांना गुलाम...