- अभिषेक भोसले
युद्ध आणि त्यात निर्माण होणार्या फेक बातम्या किंवा फोटो ही फक्त आजची समस्या नाहीये. म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या एअर स्ट्राईक नंतर आम्ही माध्यमांनी जी काही खोट्या छायाचित्रांची आणि व्हिडिओ निर्मितीची क्रियटिव्हिटी दाखविली त्याबद्दल शॅम्पेनच्या बाटल्या उडवायचं काही कारण नाही. कारण तुमच्या पूर्वीच खुद्द भारतीय सैन्याच्या माहिती अधिकार्यांनी हा पराक्रम करून दाखविला आहे.
एक लक्षात ठेवा, जिथं संघर्ष असतो तिथं बातमी. जिथं संघर्ष असतो तिथं पराक्रम, शौर्याच्या कथा जन्माला येतात. पण त्या शौर्याची मोनोपॉली जेव्हा निर्माण करायची तेव्हा तशा बातम्या, छायाचित्रं आणि व्हिडीओ माध्यमात पेरावे लागतात. अर्थात हे शौर्याचं राजकारण असतं.
जेव्हा संघर्ष चालू असतो तेव्हा थेट सीमेवरून वार्तांकन करण्याला मर्यादा असतात. त्यावेळी युद्धासंबंधी सैन्याकडून होणार्या ब्रिफ्रींग किंवा पत्रकार परिषदा ह्या युद्धात घडणार्या घडामोडींसंबंधीच्या एकमेव विश्वासार्ह स्त्रोत मानल्या जातात. पत्रकार परिषदांमधून तुमच्या समोर येणारी माहिती ही सुरक्षा, आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्या त्या काळातील सरकारची प्रतिमा जपणं या तीन पातळ्यांवर पडताळून माध्यमांसमोर ठेवली जाते. आणि मग वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र यामधून ती तुमच्यापर्यंत येते.
जेव्हा संघर्ष चालू असतो तेव्हा थेट सीमेवरून वार्तांकन करण्याला मर्यादा असतात. त्यावेळी युद्धासंबंधी सैन्याकडून होणार्या ब्रिफ्रींग किंवा पत्रकार परिषदा ह्या युद्धात घडणार्या घडामोडींसंबंधीच्या एकमेव विश्वासार्ह स्त्रोत मानल्या जातात. पत्रकार परिषदांमधून तुमच्या समोर येणारी माहिती ही सुरक्षा, आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्या त्या काळातील सरकारची प्रतिमा जपणं या तीन पातळ्यांवर पडताळून माध्यमांसमोर ठेवली जाते. आणि मग वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र यामधून ती तुमच्यापर्यंत येते.
सुरक्षा, आंतरराष्ट्रीय धोरण आणि सरकारची प्रतिमा यांना धक्का लावणारी माहिती एक तर सांगितलीच जात नाही किंवा त्यात बदल करून सांगितली जाण्याची शक्यता असते. त्यातही सरकारच्या हितसंबंधांना बाधा पोहोचणार नाही याची पूर्ण काळजी संरक्षण मंत्रालयाकडून घेतली जाते.
राष्ट्रवादाच्या नशेत झिंगलेल्या काळात हे स्विकारणं जरा अवघड आहे. युद्ध हे राष्ट्रवादचं कॅल्शिअम, पोटॅशियम, नायट्रेट सगळंच असतंय. तसंच ते वास्तव आणि खरी माहिती समोर न येऊ देण्यासंबधीचं सायनाईड, अर्सेनिक पण असतंय.
व्हिएतनाम युद्धाची गुप्त कागदपत्र बाहेर पडेपर्यंत अमेरिकेन नागरिकांना तिथल्या सरकारनी मूर्खच बनवलं होतं. सातत्यानं खोटी माहिती, आणि ब्रिफिंग तिथलं सरकार आणि सुरक्षा यंत्रणा देत होत्या.
तसं आपल्या बाबतीत घडलं तर ? तसं घडत असेल तर ते भविष्यात समोर येईलच. पण भूतकाळात हे अनेक वेळा घडलंय. त्यातली एक घटना कॅरवान या मासिकानं एएनआय या वृतसंस्थेविषयी केलेल्या स्टोरीमध्ये सांगितली आहे.
१९७१ च्या युद्धात बांग्लादेशातील ढाका शहराजवळच्या टॅंगेल या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याच्या पाठीमागं भारतानं विमानातून पॅराट्रूपर्स उतरविले होते. त्यावेळी भारतीय सैन्याचे माहिती अधिकारी राममोहन राव होते. या कारवाईचा फोटो माध्यमांना पुरविणं गरजेचं होतं. पण तो फोटो उपलब्ध करू देणं राव यांना शक्य होत नव्हतं. मग राव यांनी एक नामी शक्कल शोधून काढली. त्यांनी युद्धाच्या काही दिवसांपूर्वीच आग्रा येथे झालेल्या पॅराट्रूपर्सच्या सरावाचा फोटो मिळवलं, तो क्रॉप केला आणि त्याच्या शीर्षकासहित १००० कॉपी छापून घेतल्या. दुसर्या दिवशी देशातील सर्व वर्तमानपत्रांनी हा फोटो पहिल्या पानावर छापला. सैन्याच्या माहिती अधिकाराच्या कृपेनं आग्रा येथील सरावाचा तो फोटो बांग्लादेशमधील युद्धाचा ऐतिहासिक शौर्याचा फोटो म्हणून इतिहासात नोंदविला गेला.
![]() |
| १९७१ च्या युद्धात सैन्यानं आग्रा येथील सरावाचा फोटो बांगलादेशातील टॅंगेल येथील आहे म्हणून वृत्तपत्रांना पुरविलेला फोटो |
(बरं या अनुषंगानं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राममोहन राव हे स्मिता प्रकाश यांचे वडील होय. त्या सध्या एएनआय च्या संपादक आहेत. १ जानेवारी २०१९ ला नरेंद्र मोदी यांनी स्मिता प्रकाश यांना मुलाखत दिली होती. राव यांनी 'कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेशन: क्रोनिकल्स ऑफ अ कम्यूनिकेटर' हे त्यांच्या कामातल्या आठवणीं संबंधीचं पुस्तक लिहिलं आहे)
त्यानंतर कृतीबद्दल त्यांनी देशातील माध्यमांची आणि नागरिकांची कधीच माफी मागितली नाही. या घटनेसंबंधी त्यांनी २०१३ लेखही लिहिला होता.
१९७१ मध्ये तंत्रज्ञान किमान आजच्या एवढं प्रगत नव्हतं. आज तंत्रज्ञानाचा वापर करून असा खोटा आशय, फोटो आणि व्हिडिओ निर्माण करण्याच्या शक्यता कित्येक पटीनं जास्त आहेत. मागच्या एक महिन्यात पेपर, टि.व्ही, सोशल मिडियातून माझ्या डोळ्यासमोर आलेले फोटो असेच पेरलेले खोटे असले तर ? त्या फोटोंच्या आधारे मी माझी मतं बनवून व्यक्त झालो असेल, मित्र - मैत्रिणींशी वाद घातला असेल तर ? भविष्यात ते कळेलच.
पण युद्ध आणि राष्ट्रवादनं आशयाच्या सत्यतेला दिलेल्या सायनाईट आणि आर्सेनिकच्या डोसाचा परिणाम तुमच्या - माझ्या मेंदूवर होवू द्यायचा नसेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे, ती म्हणजे संघर्षाच्या काळात माध्यमातून तुमच्यासमोर येणार्या आशयाला वर नमूद केल्याप्रमाणं हितसंबंधाची चाळणी असते.

Comments
Post a Comment