धर्माबादेतल्या बिलोलीकडं
जाणाऱ्या रेल्वे फाटकाजवळच्या चहाच्या टपरीवर बसलो होतो. बिलोलीला जाण्यासाठी बसची
वाट पाहत होतो. टपरीचं अंगण नुकतंच शेणानं शिंपडून घेतलेलं. त्याचे काही शिंतोडे
मी बसलोय त्या बॅंचवर पडलेत. वेळ होवून गेली तरी बस येई ना म्हणून बाजूला बसलेल्या
गावकऱ्याला विचारलं, त्याला उत्तर देत तो म्हणाला, 8 ची बस तर गेली की केव्हाच,
आता पेपराच्या गाड्या येतात, त्यात बसून जा.
पेपराच्या गाड्यांचा
काही पत्ता नाही. मागच्या कित्येक दिवसांच्या प्रवासानं उत्साह म्हणावा तेवढा शिल्लक
नव्हता. समोरून गेलेल्या एक - दोन
रेल्वेनं, गेटमनच्या फाटक चालू - बंद
करण्याच्या हालचालींनी तेवढंच वेळ निघून जात होता. समोर पेपर वाचत बसलेल्या
माणसाच्या हातातल्या पेपरातली पहिल्या पानावरची राफेल घोटाळ्याची बातमी बसल्या
बसल्या वाचून झाली होती. दुसरी रेल्वे निघून गेल्यानंतर उघडलेल्या फाटकातनं इंडिगो कार टपरी समोर येवून उभी राहिली. कपालावर
केसरी टिक्का लावलेला, गळ्यात भगवा गमजा घातलेल्या ड्रायव्हरनं विचारलं, नांदेड
यायचंय का ?
मी म्हणालो, बिलोलीला जायचंय.
नांदेड तर नाही तर नाही बिलोलीचं गिऱ्हाईक भेटलं याचं त्याला सुख होतं.
नांदेडवरून कोणत्यातरी साहेबांना सोडायला ही गाडी आली होती. वापस जाताना मग
असे प्रवासी घेऊन जाऊन चहा पाण्याचा
तेवढाच खर्च काढण्याचा प्रयत्न ही ड्रायव्हर मंडळी करत असतात.
ड्रायव्हरच्या बाजूला बसून इकडच्या तिकडच्या पावसा - पाणाच्या गप्पा झाल्यानंतर विषय राजकारणावर
आला. नांदेड म्हटलं की, मग चर्चा अशोक चव्हाणापासून सुरू.
मी – मग आता हवा आहे की नाही अशोक चव्हाणांची.
ड्रायव्हर – काय बी नाही. आदर्शमधी (आदर्श घोटाळ्यात) नाव आल्यापासून कोणी
विचारणा गेलंय. हे सगळे कॉग्रेसवाले असलेच.
ड्रायव्हर – मग काय... गांधी घराण्यातलं आत्तापर्यंत कुणी – कुठं सरकारी नौकरी
चाकरी केलंय का तरी कसला पैसा हाय त्यांच्याकडं. कुठून आला सांगा बरं. लोकांचे
पैसे खाल्लेत नुसते.
मोदीनं एक बरं केलंय बघा, हे
माय लेकाचे पासपोर्ट जप्त केलेत आत्ता. च्या मायला आत्ता बसा म्हणा बोंबलंत हिकडंच
आणि मोदी काय त्यांना सोडत नाय बघा आत्ता.
मी – हे कुठून कळालं
ड्रायव्हर – व्हॉट्सअपवर आलंय की.
मी – सगळं ठीक आहे. पण सध्या ते राफेल वगैरेची लय चर्चा चालू आहे.
ड्रायव्हर – अहो घेऊ द्या की विमानं. आपण आत्तापर्यंत कुठं काय घेतलं. काय हाय
का आपल्याकडं जगाला दाखवायला, फाटकेच तर हाव आत्तापर्यंत. आता कुठं तर ते घेऊलालय
तर घेऊ द्या की.
मी – अरं पण पैसाचा घोटाळा झालाय म्हणायलेत की. पैसा तर लोकांचाच आहे ना.
ड्रायव्हर - शेट्टं, जाऊद्या की,
थोडंच आपलं एकट्याचं जाईलंय. जाईलंय तर अख्ख्या गावचं जाईलंय की. जाऊद्या जाऊद्या.

समाजात असा एक वर्ग आहे, जो तशा अर्थी भक्त वर्गात मोडत नाही, तरीही या सरकारला अजून वेळ द्यायला हवा अशा मताचा आहे.
ReplyDeleteदुसरी गमतीशीर आणि तेवढीच गंभीर शक्यता ही पण आहे, की कदाचित ज्याच्यावर विश्वास ठेवला ते राजकारणी पण आधीच्यांसारखे किंबहुना त्यापेक्षा वाईट निघाले हे त्यांना पचवता येत नसावे किंवा सरकार निवडायला आपण नालायक ठरलो हेही त्यांना स्वीकारता येत नसावे.