Skip to main content

वॉर्निंग - 1 - (अभिषेक भोसले)



धर्माबादेतल्या बिलोलीकडं जाणाऱ्या रेल्वे फाटकाजवळच्या चहाच्या टपरीवर बसलो होतो. बिलोलीला जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. टपरीचं अंगण नुकतंच शेणानं शिंपडून घेतलेलं. त्याचे काही शिंतोडे मी बसलोय त्या बॅंचवर पडलेत. वेळ होवून गेली तरी बस येई ना म्हणून बाजूला बसलेल्या गावकऱ्याला विचारलं, त्याला उत्तर देत तो म्हणाला, 8 ची बस तर गेली की केव्हाच, आता पेपराच्या गाड्या येतात, त्यात बसून जा.
पेपराच्या गाड्यांचा काही पत्ता नाही. मागच्या कित्येक दिवसांच्या प्रवासानं उत्साह म्हणावा तेवढा शिल्लक नव्हता. समोरून गेलेल्या एक  - दोन रेल्वेनं, गेटमनच्या फाटक चालू  - बंद करण्याच्या हालचालींनी तेवढंच वेळ निघून जात होता. समोर पेपर वाचत बसलेल्या माणसाच्या हातातल्या पेपरातली पहिल्या पानावरची राफेल घोटाळ्याची बातमी बसल्या बसल्या वाचून झाली होती. दुसरी रेल्वे निघून गेल्यानंतर उघडलेल्या फाटकातनं  इंडिगो कार टपरी समोर येवून उभी राहिली. कपालावर केसरी टिक्का लावलेला, गळ्यात भगवा गमजा घातलेल्या ड्रायव्हरनं विचारलं, नांदेड यायचंय का ?
मी म्हणालो, बिलोलीला जायचंय.

नांदेड तर नाही तर नाही बिलोलीचं गिऱ्हाईक भेटलं याचं त्याला सुख होतं.
नांदेडवरून कोणत्यातरी साहेबांना सोडायला ही गाडी आली होती. वापस जाताना मग असे प्रवासी घेऊन जाऊन चहा पाण्याचा  तेवढाच खर्च काढण्याचा प्रयत्न ही ड्रायव्हर मंडळी करत असतात.

ड्रायव्हरच्या बाजूला बसून इकडच्या तिकडच्या पावसा  - पाणाच्या गप्पा झाल्यानंतर विषय राजकारणावर आला. नांदेड म्हटलं की, मग चर्चा अशोक चव्हाणापासून सुरू.

मी – मग आता हवा आहे की नाही अशोक चव्हाणांची.

ड्रायव्हर – काय बी नाही. आदर्शमधी (आदर्श घोटाळ्यात) नाव आल्यापासून कोणी विचारणा गेलंय. हे सगळे कॉग्रेसवाले असलेच. 

मी – कसले ? 

ड्रायव्हर – पैसे खात्यात नुसते. 

मी – फक्त कॉग्रेसवालेच पैसे खातेत ?

ड्रायव्हर – मग काय... गांधी घराण्यातलं आत्तापर्यंत कुणी – कुठं सरकारी नौकरी चाकरी केलंय का तरी कसला पैसा हाय त्यांच्याकडं. कुठून आला सांगा बरं. लोकांचे पैसे खाल्लेत नुसते.
मोदीनं एक बरं केलंय बघा, हे माय लेकाचे पासपोर्ट जप्त केलेत आत्ता. च्या मायला आत्ता बसा म्हणा बोंबलंत हिकडंच आणि मोदी काय त्यांना सोडत नाय बघा आत्ता.

मी – हे कुठून कळालं

ड्रायव्हर – व्हॉट्सअपवर आलंय की.

मी – सगळं ठीक आहे. पण सध्या ते राफेल वगैरेची लय चर्चा चालू आहे.

ड्रायव्हर – अहो घेऊ द्या की विमानं. आपण आत्तापर्यंत कुठं काय घेतलं. काय हाय का आपल्याकडं जगाला दाखवायला, फाटकेच तर हाव आत्तापर्यंत. आता कुठं तर ते घेऊलालय तर घेऊ द्या की.

मी – अरं पण पैसाचा घोटाळा झालाय म्हणायलेत की. पैसा तर लोकांचाच आहे ना.

ड्रायव्हर -  शेट्टं, जाऊद्या की, थोडंच आपलं एकट्याचं जाईलंय. जाईलंय तर अख्ख्या गावचं जाईलंय की. जाऊद्या जाऊद्या.    



Comments

  1. समाजात असा एक वर्ग आहे, जो तशा अर्थी भक्त वर्गात मोडत नाही, तरीही या सरकारला अजून वेळ द्यायला हवा अशा मताचा आहे.

    दुसरी गमतीशीर आणि तेवढीच गंभीर शक्यता ही पण आहे, की कदाचित ज्याच्यावर विश्वास ठेवला ते राजकारणी पण आधीच्यांसारखे किंबहुना त्यापेक्षा वाईट निघाले हे त्यांना पचवता येत नसावे किंवा सरकार निवडायला आपण नालायक ठरलो हेही त्यांना स्वीकारता येत नसावे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

MeToo कॅम्पेन आणि 'इरेझर पोएट्री'

- अभिषेक भोसले  ऑक्टोंबर महिन्यात अमेरिकेतील वर्तमानपत्रांची पानं नावाजलेल्या व्यक्तींवर केल्या गेलेल्या बलात्कार, विनयभंग आणि लैगिंक शोषणाच्या आरोपांनी भरलेली दिसत होती. ही प्रकरणं जशी समोर येऊ लागली तशी त्याची तीव्रताही जगाच्या लक्षात आली. यासर्व घडामोडीतून जन्म झाला MeToo या मोहिमेचा आणि सोशल मिडियावरील हॅशटॅगचा. मोठ्या प्रमाणात जगातील तरूणी – महिलांनी #MeToo चा वापर करून स्वता : वर झालेला विनयभंग, बलात्कार आणि लैगिक शोषणाचे अनुभव सोशल मिडियावर मांडले. अनेकांनी या सर्व प्रकरणांवर आपली मतं व्यक्त केली. काहींनी याला स्त्रीमुक्तीची चळवळ सांगितलं, काहींनी चळवळ म्हणणाऱ्याची खिल्ली उडवली. पण महिलांच्या आतमध्ये साचलेला काळाकुट्ट भूतकाळ या रूपानं किमान समोर आला.  सामान्य नागरिक, महिला, कार्यकर्त्या त्यांच्यापरीने या सर्व विषयांवर व्यक्त होत होत्या. इरेझर पोएट्रीवरील लेखकाचा लेख वाचण्यासाठी  "शब्द खोडून तयार झालेली राजकीय कविता" -  https://goo.gl/uZKy4d ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्या बहुतांश व्यक्ती ह्या नावाजलेल्या होत्या. त्यामुळं त्यातील अनेकांनी बच...

चेहऱ्यावरचे मुखवटे फक्त वेगळे

- अभिषेक भोसले सर्व पक्ष निवडणुकीचे उमेदवार जाहिर करण्यात व्यस्त आहेत. याद्यांवर याद्या प्रसिद्ध होत आहेत. वर्तमानपत्रांचे मथळे त्यासंंबधीच्या बातम्यांनी भरून जात आहेत. अशात काही महत्त्वाचे मथळे आपल्या नजरेतून सुटण्याची शक्यता आहे. त्यातला 24 मार्चचा बीबीसी संकेतस्थळावरचा हा एक मथळा ' कांग्रेस सरकार ने छत्तीसगढ़ में अडानी को दिया कोयला खदान का ठेका, उठे सवाल '  आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाची ही महत्त्वाची बातमी आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील गिधमुडी आणि पतुरिया  इथल्या कोळसा खाणी राज्य सरकारकडून अदाणी समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्तीसगडमध्ये कॉग्रेसचं सरकार आहे.  हो, तेच कॉग्रेसचं सरकार ज्यांनी अदाणी समूहाला सातत्यानं विरोधी पक्ष असताना विरोध दर्शविला होता. राहूल गांधी हे त्या पक्षाचे महासचिव आहेत.  कॉग्रसेच महासचिवांनी 2015 मध्ये याच भागाचा दौरा करत तत्कालिन भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठ्या उद्योग समूहांना मदत मुद्दयावरून घेरलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप सरकार आदिवासींच्या जमिनी अद...

एबीसी ते मटा, लोकसत्ता - माध्यमांचं चारित्र्य आणि विश्वासार्हता

- अभिषेक भोसले  ब्रेयन रॉस यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल १. अमेरिका, वार - शनिवार, एबीसी वृत्तवाहिनीच्या वर्ल्ड न्यूज टूनाईट बातमीपत्राचं प्रसारण चालू झालेलंं होतं. वृत्तवाहिनीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पणाला लागलेली असताना न्यूजरूममधील वातावरण एकदम गंभीर. एबीसी वृत्तवाहिनीसाठी २० दशकांपासून कार्यरत असलेला आणि शोध पत्रकारितेतील महत्त्वाचं नाव असलेला पत्रकार ब्रायन रॉस बातमीपत्रात येतो. काल म्हणजे शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या बातमीतील काही तथ्य चुकीचे असल्याचा खुलासा करतो. जाहिररित्या देशाची माफी मागतो. तो माफीनामा थेट प्रसारित करण्यात येतो. वृत्तवाहिनीच्या विश्वासार्हतेला लागलेल्या सुरूंगातून सावरण्याचा एबीसी वृत्तवाहिनीचा हा माझ्या दृष्टीकोनातून स्वागतार्हाय प्रयत्न  लोकसत्ताचे संपादक गिरिष कुबेर यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल  २. तीच तारीख, तोच वार, फक्त देश मात्र वेगळा. स्थळ - मुंबई. माध्यमं जागतिक नाहीत मात्र प्रादेशिक. नाव - लोकसत्ता, महानगर, जनशक्ती आणि महाराष्ट्र ट...